स्त्री च्या आयुष्याला नवे वळण देणारा भाग्याचा दिवस आज मीरासाठी उजाडला होता. अर्थातच आज तिचे लग्न आहे. त्यामुळेच मीरा खूप आनंदी होती.
मीरा… अगदी साध्या स्वभावाची, समजूतदार आणि मनमिळाऊ मुलगी.. कायम हसऱ्या चेहऱ्याची. सावळीशी ; उंचीला शोभेल अशी शरीरयष्टी. मीराने जन्मतः आपल्या आईला गमावले होते. घरातील एकुलती एक मुलगी.. आई सोडून वडील, आजी, आजोबा ,काका-काकू असं भरगच्च कुटुंब होत तिचं.. मात्र लहानपणापासूनच तिला कुटूंबातील कोणत्याही सदस्यांकडून आपुलकी, प्रेम ,जिव्हाळा मिळालाच नाही. तिच्या वाटेला नेहमी फक्त तिरस्कार आणि शिव्याशापच आले. वडिलांकडून कधी जिव्हाळा नाही मिळाला. आईविना पोर एकटीच जीवन जगत होती. कोवळ्या वयात तिला घरकामांमध्ये जुंपले गेले. शिक्षणाची गोडी असूनही शिक्षणापासून वंचित राहिली.
या सर्वांमागे कारण काय….. तर. ती मुलगी होती… घरच्यांवर ओझं म्हणून जन्माला आलेली… मुलगा हवा या हव्यासापोटी तीन गर्भपातानंतर जन्माला आलेली …मुलगी..
मीराचे कुटुंब हे त्या गावातील तालेवार कुटुंबापैकी एक होते. घरातील फ़क्त पुरुष मंडळी शिक्षित होते. स्त्रिया मात्र अशिक्षित. मीराची आईसुद्धा अशिक्षित होती, त्यामुळेच चूल आणि मुलं या गोष्टींनाच संसार मानून जगणारी होती. यामुळेच वंशाला दिवा हवा( मुलगा) या साठी स्वतःच्याच रक्तामासाच्या मुलींचे जीव घेण्यास बळी पडली. वारंवार होणाऱ्या गर्भपातामुळेच मीराला जन्म देताच आईने प्राण त्यागले. घरच्यांना मात्र मुलगी झाल्याचा आनंद कमी दुःखच जास्त होत. आता झालीच तर तिला सांभाळावे तर लागणारच. यासाठी नाईलाजाने मीरचे संगोपन करणे त्यांना भाग पडले.
त्यानंतर ही घरच्यांची मुलगा व्हावा यासाठीची धफपड चालूच होती. मीराच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. मीराची सावत्र आई स्वभावाने प्रेमळ होती. तिचे नाव माया ..मीराला तिने आईची माया दिली. प्रेम दिले. मीरा तिलाच आई म्हणू लागली. घरच्यांना मीराच्या आईने तिच्याशी प्रेमाने वागणे पटत नसे. ते नेहमी मीराला घरकामांमध्ये जुंपायचे. आईच्या प्रेमापासून तिला लांब ठेवले गेले. मात्र सावत्र आईला नेहमीच मीराबद्दल आपुलकी होती. ती मीरला स्वतःच्या मुलीप्रमाणे वागवत असे.
कालांतराने , मीराची दुसरी आई म्हणजेच मायाच्या बाबतीतही तेच घडु लागले जे मीराच्या आईच्या बाबतीत घडले होते. मीरा तिच्या आईचे दुःख स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होती. शेवटी तेच झाले…जे विधिलिखित होते. मीराच्या दुसऱ्या आईनेही एका गोंडस मुलाला जन्म दिला मुलगा झाल्याचा सगळ्या कुटुंबाला आनंद झाला. याच आनंदात गावागावांत साखर वाटण्यात आली, अन्नधान्य वाटण्यात आले. वंशाला दिवा मिळाल्याचा घरच्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र याच दुःखाचा डोंगरही त्यांच्या कुटुंबावर कोसळला होता.मुलाला जन्म देताच आईने प्राण सोडले होते.
मीरा पुन्हा पोरकी झाली. माया सोडून घरातील कोणीच तिला आपलंसं मानत नव्हतं.तो आपुलकीचा हातही तिच्या डोक्यावरून गेला होता. यानंतर मात्र मीरा घरची मुलगी नव्हे ,तर मोलकरीण बनून जगत होती. ती घरची सर्व कामे करत असे. नेहमी घरच्यांची बोलणी ऐकत असे. पण ती नेहमीच सर्वांशी आदराने वागायची. तिची कोणत्याच बाबतीत तक्रार नसायची. आईनंतर मीरानेच बाळाची सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली. मीराच्या वडीलांचीही तब्बेत दिवसेंदिवस खराब होत होती. त्यांची सेवाही मीरा आपुलकीनेच करत असे.
मीराने तिच्या लहान लहान भाऊ. प्रकाश चे संगोपन मोठी बहीण नव्हे तर आईप्रमाणे केली.दोघे बहीण-भाऊ एकमेकांच्या संगतीने मोठे होत होते. घरात मात्र कोणाच्याही स्वभावात बदल होत नव्हता. ते आजही मीरला आपली मानत नव्हते. प्रकाशचा मात्र मीरावर फार जीव होता. तिच्याबाबत वाटणाऱ्या थोड्या फार आपुलकीखातर का होईना वडिलांनी एका चांगल्या घरात तिचे लग्न जमवले. मीराच्या स्वभावगुणांमुळे तिला तिच्या मनाप्रमाणे प्रेमळ व समजून घेणारा जिवलग मिळाला.
आणि आज तोच दिवस….. मीराच्या नवीन सुखी प्रवासाची सुरुवात….