मैत्रीण

ज्या क्षणी त्या दिवशी मी तिला पाहिलं माझ्या परिसरात मी एकटाच होतो. फक्त मीच नव्हे तर कोणाचीही नजर अलगद तिच्याकडे वळेल अशी.. काही शाळकरी मुलांना रस्ता ओलांडताना मदत करणारी. बाह्य सौंदर्याबरोबरच आंतरिक सौंदर्यानेही भुरळ घालणारी. अचानक भानावर आलो तर ती नजरेआड झालेली जाणवली. ती केव्हाच तिथून निघून गेली होती. मात्र मी तिथेच एकटक पाहत उभा होतो. तिच्या आठवणीत गुंग मी घरी परतलो.

काही दिवसांनी त्याच रस्त्यावर ती पुन्हा दिसली. त्या दिवशी मात्र मी तिच्या नकळत तिच्या घरापर्यंत पोहोचलो. आजूबाजूला वाहनांच्या हॉर्नचे कर्कश आवाज नेहमीच ऐकू येतील, माणसांची वर्दळ नेहमी पाहायला मिळेल, तीच बायकांची पाणी भरण्यासाठी रांगेत लागलेली भांडण, कामावर जाण्यासाठी झालेली घाई गडबड पाहायला मिळेल , मात्र या सगळ्या गडबडीत लहान मुलांनी भरलेल्या खेळकर अशा चाळीत ती राहायची. तिला येताना पाहताच मुलांनी तिला गोल घेर घातला व चॉकलेट, चॉकलेट ओरडू लागली. तिनेही सर्वाना प्रेमाने कुरवाळत पिशवीत आणलेले चॉकलेटस वाटले व घरात गेली. मी हे सर्व दृश्य चाळीच्या बाहेरून लांबून पाहत होतो. आता हा माजा रोजचा दिनक्रम झाला होता. घरून निघालो की पहिलं इथे यायचं तिला डोळे भरून पाहायचं व नंतर पुढील कामाला जायचं.

एके दिवशी मी नेहमीप्रमाणे चाळीबाहेर उभा होतो मात्र ती दिसलीच नाही. मी सगळीकडे नजर फिरवुन पहात होतो. ती मात्र अचानक माझ्या समोर यरुन उभी राहिली. माझी चोरी पकडली गेली अशा भावात मी मान खाली घालून उभा होतो. ती मला पाहताच हसू लागली व म्हणाली ” तू रोज इथे येतोस ना? कारण कळू शकेल..” मी चाचपत चाचपत उत्तर दिलं, ” नाही .. नाही.. असच..ते….. ( आठवत) हा .. माझ्या मित्राला भेटायला आलो होतो. ती पुन्हा हसू लागली. ती न रागावता मला तिच्या घरी घरून गेली.तिच्या घरात कोणीच नव्हतं . बहुदा ती एकटीच राहत असावी. मी तिला फार काही न विचारात शांत बसून होतो. तिने मला चहा प्यायला दिला व माझ्याशी गप्पा मारू लागली. मला वाटलेलं की कदाचित ती रागावली असावी मात्र तसं काहीही नव्हतं. उलट त्या दिवशी आमची मैत्री झाली . गप्पांना रंगत आली होती.

अनोळखी पणाने ही आमच्यात मैत्रीचं नवं नात फुलत होतं. तिच्या घरी माझ रोज येणं- जाणं होत असे. रोजच्या गप्पा गोष्टी, एकमेकांचे सुख-दुःख सांगता सांगता कधींही न तुटणार असं.. मैत्रीचं नात आमच्यात तयार झालं. एके दिवशी सकाळी ,मी तिच्या घरी आलो. घरी पोहोचलो तर ती अंथरुणावर झोपलेली होती. तिचा अंगात ताप होता. हात लावताच चटका बसेल इतका.. मी तिला घेऊन डॉक्टरांकडे आलो. तपासून झाल्यावर डॉक्टरांनी मला औषधांची पावती दिली व म्हणाल्या, ” यांची फार काळजी घ्यायाची गरज आहे? कारण… ” डॉक्टर पुढे बोलणार इतक्यात तिने अडवले व म्हणाली ,” मला डॉक्टर सोबत बोलायचं आहे तू बाहेर थांब.” मी तिथून बाहेर आलो. पण डॉक्टर मला काय सांगणार होत्या या विचाराने अस्वस्थ होतो. काही काळजीच कारण तर नाही ना? तिला काही जाणार तर नाही ना? असे विचार सारखे मनात घोंगावत होते. मी दरवाजत उभा राहून त्यांचे बोलणे ऐकण्याचा प्रयत्न केला तर ऐकू आले, ” तुम्ही काळजी घ्या? अजून फक्त काही दिवस बाकी आहेत?”

डॉक्टर असे का म्हणाले असतील या विचाराने मी गडबडलो होतो. ती बाहेर येताच तिला विचारण्याचा प्रयत्न केला. ” काय म्हणाले डॉक्टर.. काही काळजीच कारण तर नाही ना” तिने नकारार्थी मान हलवली. पुढे मात्र रस्त्याभर ती गप्पच होती.मी घरी परतलो. मात्र तिच्या काळजीने झोप ही धड लागेना. अस्वस्थ बसून होतो.

आज .. आजचा संपूर्ण दिवस मला तिच्यासमवेत घालवायचा होता. कारण आज माझा वाढदिवस आहे.मी आनंदाने तिच्या घरी पोहोचलो. मात्र घराला कुलूप…. आजूबाजूला विचारपूस करता समजले की ती कालच चाळ सोडून निघून गेली. कुठे गेली? का गेली? कोणालाच ठाऊक नव्हते. दिवसभर तिला शोधत फिरलो. मात्र ती नाही सापडली. हिरमुसलेल्या चेहऱ्याने मी घरी परतलो. पाहतो तर आईबाबांच्या ही चेहऱ्यावर दुःखाचे ठसे उमटलेले.

मी स्वतःला सावरलं व आई बाबांकडे गेलो. ते का रडत आहेत? हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला.तेव्हा आई बाबांनी मला एक सत्य सांगितलं. आयुष्याला नवी कलाटणी देणार सत्य… ते म्हणाले,” सोहम , आम्ही तुला काय सांगतोय ते नीट ऐकून घे. तू आमचा मुलगा नाहीस. आम्ही तुझे पालनाकर्ते फक्त.. तुझे काका- काकू. तुझ्या जन्मावेळी तुझ्या आईला कॅन्सर असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. आईला कॅन्सर असल्याने बाळाला( तुला) त्याचा काही त्रास होऊ नये म्हणून तुझ्या आईने तुला आमच्या हाती सुपुर्त केलं व तुझ्यापासून दूर झाली. गेली 15 वर्षे ती तुझ्यापासून लांब आहे. ती आम्हालाही कधीच भेटली नाही. आज आम्हाला तुझी आई मिळाली मात्र तिच्या अखेरच्या श्वासात………..” इतके बोलुन ते रडू लागले.

आईने कपाटातून एका व्यक्तीच्या फोटो आणून माझ्याकडे दिला व म्हणाली,” ही तुझी आई..”फोटो पाहतच मी गडबडलो, ” आई……..” जिला मी रोज भेटायचो.. तिच्याशी बोलायचो.. माझे सगळे सुख-दुःख सांगायचो ती माझी सर्वात जवळची मैत्रीण माझी आई होती. माझी आई .. माझी मैत्रीण..

Leave a comment