अदृश्य असे दृश्य…

आज अचानक गावची खूप आठवण आली. आपलं गाव कास आहे?तेथील वातावरण, तेथील माणसे.. कसं असेल..? हा प्रश्न नेहमीच पडायचा. बाबा नेहमीच मला गावाकडच्या गोष्टी सांगत असतं. माझ्या दिवसाचा सूर्योदय हा गावच्या कल्पनेने व्हायचा आणि सूर्यास्त ही.. रोज एक नवीन किस्सा ऐकूनच मी झोपी जायचे. मात्र मला गोष्टी सांगताना बाबा त्यांच्या आठवणीत गुंगायचे.

बाब सांगायचे, पंधरा वर्षांपुर्वी आई व ते उद्योगधंद्याच्या शोधत शहरात आले. शहरातील या गोंधळी जीवनात गावची आठवण मात्र कायमच त्यांच्या मनात राहिली. कामाचा व्याप व घराची जबाबदारी यांमुळे पुन्हा गावी येणे कधी जमलेच नाही. पण आता माझ्या हट्ट पुरवण्यासाठी… आणि त्यांच्या आनंदासाठी गावी जायचे ठरले.

आई बाबांपेक्षाही मला गाव पाहण्याची जास्त उत्सुकता लागली होती. संपूर्ण प्रवासात गावच्या कल्पनेत रमलेले.. मी. बाबा सांगायचे, आमचे गावाला मोठे घर आहे. घराच्या चारही बाजूंनी हिरवळ रान.. आणि बलदंड मोठं वडाचे झाड.. ज्यावर लहानपणी ते झोका बांधून खेळत व झाडाच्या सावलीत शांतपणे झोपी जात. घरापर्यंत पोहोचण्याआधीच तेथील दृश्य कसे असेल हे मला नजरेसमोर दिसत होतं.

पाहता पाहता आम्ही गावच्या वेशीवर यरुन पोहोचलो. वेशीजवळुन घरी पोहोचायला 2 किमी अंतर होते. तेवढे अंतर चालत जावे लागायचे. शाळेतून घरी जाताना बाब याच रस्त्याने जात व वाटेतील झाडांवर चढून बोर, पेरु पाडून खात. पण आता मात्र तेथे काहीच नव्हतं.. अगदी सामसूम रस्ता.. कदाचित अंधार असल्याने काही दिसत नसावं, असा विचार करून आम्ही पुढे चालू लागलो.

चालून – चालून माझे पाय दुखू लागले. थोडी विश्रांती घेऊयात म्हणून आम्ही थांबलो. समोरच एक झोपडी दिसली. झोपडीत संपूर्ण अंधार होता. काही माणसे बाहेर शेकोटी पेटवून बसली होती. पण आश्चर्यच आम्हाला पाहताच ते चटकन झोपडीत पळाले. आम्ही पुन्हा चालू लागलो. थोडे अंतर चालत जाताच अचानक मागून कोणी तरी पळत असल्याचा आवाज आला. आम्ही मागे वळून पाहिले तर ते लोक हातात काठी घेऊन आमचाच पाठलाग करत होते. मला तर काय चाललंय हेच कळत नव्हतं. आम्ही जीव वाचून पळू लागलो. रात्रीच्या त्या काळोखात गावात पळापळीला जोर चढला होता. पळत पळता आम्ही एके ठिकाणी येऊन थांबलो. कारण त्या ठिकाणी आम्हाला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत होता. आमचा पाठलाग करणारी माणसेही तिथे जाताना पाहताच मागे फिरली. पण इथे आम्हाला जीभ गुदमरल्यासारखं वाटत होतं. एकामागोमाग एक आई व बाबा भोवळ येऊन खाली पडले. मी त्यांना उठवण्याचा प्रयन्त केला मात्र त्याच क्षणी कोणीतरी माझा गळा दाबून धरल्याने जाणवून मी दचकले. खूप घाबरले. एक छाया माझ्या अंगावर पडली होती. अदृश्य … उंचच उंच.. तिचे हात माझ्या गळ्याशी.. माझा श्वास कोंडला जाऊन मी सुद्धा जमिनीवर कोसळले.

सूर्योदय होताच सुर्यकिरणांचा प्रकाश माझ्या डोळ्यावर पडला. मला शुद्ध आली. नजर फिरवून चारही बाजूंनी पाहिले तर आश्चर्यचा धक्काच बसला. गावाबद्दल असा विचार तर मी कधीच केला नव्हता.मी घाईघाईने आई बाबांना जागे केले. बाबाही अचंबित होऊन पाहत राहिले. आमच्या चारही बाजूंनी मोठंच मोठं पसरलेलं मैदान आणि संपूर्ण मैदानात अर्धवट कापलेले झाडाचे खोड. जिथपर्यंत नजर जाईल .. तेथे हेच दृश्य. त्यातीलच एका खोडावर लिहिले होते,” हे तू ऐकलेलं गाव नाही” थोडयावेळासाठी आम्ही सुन्नच झालो.

इतक्यात आईचा आवाज आला, ” अग स्वरा, उठ लवकर ” मी दचकून जागी झाले. मनात प्रश्नांचा कल्लोळ… आपलं गाव खरंच अस असेल ? मला असं स्वप्न का पडावं ? आणि स्वप्नात दिसलेली ती सावली.. ते दृश्य…….?

Leave a comment